भूम (प्रतिनिधी)-  दुष्काळी परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना बसत असून, पाण्याअभावी वारेवडगाव (ता. भूम) येथील शेतकरी विनोद लाडाणे यांनी तब्बल दोन एकर क्षेत्रातील केळीची बाग नाईलाजाने ट्रॅक्टर फिरवून मोडीत काढली. हिरवीगार बाग डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहण्याची वेळ आल्याने शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

लाडाणे यांनी दोन एकर क्षेत्रात केळीची लागवड केली होती. लागवडीपासून पिकाची मुलाप्रमाणे काळजी घेत त्यांनी खत, औषधे, मजुरी तसेच पाण्यासाठी मोठा खर्च केला. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने परिसरात पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली. उपलब्ध पाणीसाठा कमी होत गेल्याने केळीच्या बागेला आवश्यक प्रमाणात पाणी देणे शक्य झाले नाही. परिणामी बागेतील झाडांची वाढ खुंटली असून, उत्पादन घेण्यापूर्वीच पीक वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली.

केळीचे पीक वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही पाण्याअभावी ते शक्य झाले नाही. अखेर वाढता खर्च आणि पुढील नुकसान टाळण्यासाठी लाडाणे यांनी दोन एकर केळीच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवून पीक मोडीत काढले.“दोन एकर केळी मी मोठ्या कष्टाने उभी केली होती. मात्र दुष्काळामुळे ती मोडीत काढण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने या नुकसानीची तात्काळ नोंद घेऊन पंचनामा करावा आणि शासनाच्या निकषानुसार नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी शेतकरी विनोद लाडाणे यांनी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने वारेवडगाव येथील या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


 
Top