तुळजापूर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रवींद्र भीमाशंकर इंगळे यांना तुळजापूर पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले. मात्र, शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याची भूमिका इंगळे यांनी कायम ठेवली. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील यांच्या मध्यस्थीने इंगळे यांना करजखेडा येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देण्याची परवानगी मिळाली.
त्यानंतर इंगळे यांना पोलिसांच्या बंदोबस्तात करजखेडा येथे नेण्यात आले. करजखेडा येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत इंगळे यांनी दुष्काळाची तीव्रता मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. ‘मुख्यमंत्री साहेब, यंदाचा दुष्काळ कठीण आहे. शासनाने भरीव मदत दिल्याशिवाय शेतकरी उभा राहू शकणार नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे,' अशी मागणी त्यांनी केली.
यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपण दुष्काळाची पाहणी करण्यासाठीच आलो असून, परिस्थितीची गंभीरता आपल्या निदर्शनास आली आहे आणि या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही दिल्याचे इंगळे यांनी सांगितले. यावेळी धनाजी पेंदे, विष्णू काळे, शहाजी सोमवंशी, तात्या पवार, भोजने, मनोज सरवदे, महादेव टेकाळे, राजेंद्र हाके यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
