तुळजापूर (प्रतिनिधी)-तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त मंगळवार, दि. 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता गणेश विहार येथे श्री गणेशाची आरती आयोजित करण्यात आली होती. अतिशय मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात ही आरती संपन्न झाली.
या आरतीस तुळजापूर येथील पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम व स्थानिक पत्रकार बांधव तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मास मीडिया प्रमुख प्रशांत जाधव आणि मास मीडिया प्रमुख रवींद्र भराटे उपस्थित होते. यावेळी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनीही श्री गणेशाच्या आरतीचा लाभ घेतला.
दरम्यान, यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने पत्रकारांचा पारंपरिक फेटे, हार-तुरे देऊन सत्कार न करता वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी प्रत्येक पत्रकाराला एक वृक्षाचे रोपटे भेट देण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक परंपरेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
