धाराशिव (प्रतिनिधी)-  मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविणे पालकांना कठीण होत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षातील संपूर्ण शैक्षणिक शुल्क 100 टक्के माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर यांनी बुधवारी (दि. 23) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होण्याची शक्यता असून, शुल्क भरणे शक्य न झाल्याने कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क, तसेच परीक्षा शुल्क व इतर अनिवार्य शैक्षणिक शुल्कात आवश्यक ती संपूर्ण शुल्कमाफी देण्यात यावी. शुल्क भरता आले नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश, परीक्षा किंवा निकाल रोखण्यात येऊ नये, याबाबत संबंधित शैक्षणिक संस्थांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच या मागणीबाबत जिल्हा प्रशासनाने शासन आणि संबंधित विद्यापीठाकडे तातडीने प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निंबाळकर यांनी दिला आहे.

 
Top