धाराशिव (प्रतिनिधी)- अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होण्याची शक्यता गृहीत धरून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदीचे पाणी ऑक्टोबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यात दाखल होईल यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर घाटणे बंधारा येथून तुळजाभवानी मातेच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात पाणी पोहोचविण्यासाठी युधपातळीवर कामे सुरू करण्यात आली आहेत. ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष पाणी जिल्ह्यात येईल या दृष्टीने पुढील 20 दिवसात कालबद्ध पद्धतीने उर्वरित सगळी कामे पूर्ण करण्याचे संबंधित अधिकारी व ठेकेदारांच्या संयुक्त बैठकीत ठरले असल्याची माहिती पत्रकार दौऱ्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने धाराशिव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या कृष्णा-मराठवाडा प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक 2 अंतर्गत घाटणे बॅरेज ते रामदरा साठवण तलावापर्यंचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. पहिल्या टप्प्यातील उर्वरित कामे 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी दि. 10 सप्टेंबर रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घाटणे ते पडसाळी (ता. मोहोळ) तसेच पांगरदरवाडी ते सिंदफळ (ता. तुळजापूर) येथील पंपगृह, उर्ध्वगामी नलिका आदी कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. तसेच पाहणीनंतर सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावाही घेतला. यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल नाईक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
प्रकल्पातील स्थापत्य व यांत्रिकी विभागाची कामे 100 टक्के पूर्ण झाली आहेत. विद्युत विभागाचीही सुमारे 95 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. 72 किलोमीटर विद्युत वाहिनीपैकी केवळ 700 मीटर काम आजघडीला बाकी असून ते देखील 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. ट्रान्समिशन लाईनच्या आवश्यक परवानग्या घेऊन 15 ऑक्टोबरपर्यंत चाचणी पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठरवण्यात आले आहे. घाटणे बॅरेजपासून रामदरा तलावापर्यंत सुमारे 60 किलोमीटरचा पाण्याचा प्रवास होणार आहे. 27,916 अश्वशक्ती क्षमतेच्या पंपांद्वारे पाणी उचलून 15.42 किलोमीटर उर्ध्वगामी नलिका आणि 39.94 किलोमीटर कालव्याद्वारे ते पुढे नेले जाणार आहे. पांगरदरवाडी, सिंदफळ आणि रामदरा या साठवण तलावांमध्ये पाणी उपलब्ध झाल्यानंतर दुष्काळसदृश्य परिस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यास मोठा आधार मिळणार आहे.
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रामदरा ठरणार आधारवड!
उजनी धरणातून भीमा-सीना जोड बोगद्याद्वारे कृष्णेचे पाणी सीना नदीत येईल. पुढे हेच घाटणे बॅरेज आणि तेथून पांगरदरवाडी, सिंदफळ ते रामदरा तलावात येणार आहे. रामदरा तलावाची 20 द.ल.घ.मी. एवढी पाणी साठवण क्षमता आहे. तीव्र पाणीटंचाईच्या कालावधीत पिण्याच्या पाण्यासाठी या पाण्याचा आपल्याला वापर करता येणार आहे. अवर्षणाच्या कालावधीत रामदरा तलाव जिल्हावासियांसाठी मोठा आधारवड ठरणार असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.