धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दीड महिन्यांहून अधिक काळ उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामातील पिके गंभीर संकटात सापडली आहेत. धाराशिव तालुक्यातील राघूचीवाडी शिवारात सोयाबीनसह इतर खरीप पिके पावसाअभावी करपून जात असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पीक पाहणी, पंचनामे करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा व सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
शेतकऱ्यांनी सावकार आणि बँकांकडून कर्जाने पैसे घेऊन खरीप पिकांची पेरणी केली. मात्र पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी पिके जळून गेली असून काही शेतांमध्ये जमीन इतकी ओसाड दिसत आहे की जणू त्या ठिकाणी पेरणीच झाली नव्हती. आता यापुढे पाऊस पडला तरी पिकांचा जीव वाचेल; मात्र अपेक्षित उत्पादन मिळणार नसल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
राघूचीवाडी येथील शेतकरी सौदागर नलावडे यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक पूर्णतः करपून गेले आहे. शेतातील करपलेल्या पिकांची स्थिती दाखवून देत शासनाने तातडीने पीक पाहणी, पंचनामे तसेच पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी याची दखल घ्यावी. अद्याप गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतांची पीक पाहणी झालेली नसल्याने शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.धाराशिव शहरापासून अवघ्या चार-पाच किलोमीटर अंतरावर असलेली राघूचीवाडी नगरपरिषद प्रभाग क्रमांक १५ मध्ये येत असूनही या भागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राघूचीवाडीसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा, पीक नुकसान भरपाई जाहीर करावी आणि कोणतेही टप्पे न करता सर्व बाधित शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. एका बाजूला पावसाअभावी पिके हातची जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. पोटाला चिमटा घेऊन वेळेत कर्ज फेडणाऱ्या नियमित शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत असून अशा शेतकऱ्यांनाही विशेष आर्थिक मदत देण्याची मागणी आता जोर धरत आहे.