मुरूम( प्रतिनिधी)- भारत शिक्षण संस्था, उमरगा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मुरूम येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन व उद्घाटन शिबिर मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गोविंद इंगोले होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. मनोज गायकवाड, तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. किसन माने व प्रा. सुजित चिकुंद्रे प्रा भगवान चौगुले उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम, सेवाभाव व नेतृत्वगुण विकसित करणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. विद्यार्थ्यांनी समाजाच्या विकासासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच सेवा, समर्पण आणि परिवर्तन या मूल्यांचा अंगीकार करावा, असे मत प्रमुख मार्गदर्शक प्रा. मनोज गायकवाड यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य गोविंद इंगोले यांनी “मी नाही, तर तुम्ही” या वाक्यातील व्यापक विचार विद्यार्थ्यांसमोर मांडला. स्वतःपुरते न जगता समाजासाठी काहीतरी करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण करणे, हे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सेवा ही केवळ कृती नसून ती एक भावना आहे. समाजासाठी जगणे हीच खरी राष्ट्रीय सेवा आहे, असे प्रतिपादन त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना केले.

कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वी नियोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. गजानन उपासे व प्रा. प्रसाद इंगोले यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, स्वयंसेविका तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कार्याची प्रेरणा निर्माण झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. व्ही. मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आय. पी. चौधरी यांनी मानले.

 
Top