मुरूम( प्रतिनिधी)- आजचा युवक हा सशक्त विचाराने परिपूर्ण असला पाहिजे. विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेच पाहिजे, परंतु स्वातंत्र्याचा अर्थ काहीही करणे असा होत नाही. माणूस म्हणून जगताना स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता, निसर्ग संवर्धन आणि माणुसकी जोपासणे हेच खऱ्या अर्थाने तरुण पिढीचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन प्रा. किरण सगर सर यांनी केले. युवकांसाठी आयोजित वादविवाद स्पर्धेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
सध्या सोशल मीडियावर पसरणाऱ्या उलट-सुलट चर्चा, गैरसमज आणि अफवांकडे तरुणांनी दुर्लक्ष केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. चुकीच्या गोष्टींचे अनुकरण न करता चांगल्या विषयांवर चर्चा आणि मंथन झाले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. आंदोलन करताना संविधानाचे भान असावे,
युवकांनी आपली भूमिका नेहमी संविधानिक चौकटीतच मांडली पाहिजे. आंदोलने किंवा निदर्शने करताना विवेकी विचार करून सार्वजनिक मालमत्ता, पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरण आणि निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे, अशी भूमिका भावना त्यांनी मांडली. आंदोलने करतानां कधीही आपला विवेक ढळू दिला नाही पाहिजे, असे ठाम मत मांडत पुढे म्हणाले की,
युवा वर्ग हा देशाचा भविष्याचा आधारस्तंभ आहे. युवकांनी सत्य, लिखाण स्वातंत्र्य, चांगली भाषणे आणि अधिकारांचा पुरेपूर वापर करतानाच विरोधकांच्या विचारांना देखील समजून घेतले पाहिजे. जीवनात वाटचाल करताना नेहमी सकारात्मक व नकारात्मक दोन्ही बाजूंचा विचार करून सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे गेले पाहिजे, हाच उदात्त्य दृष्टिकोन माधवराव पाटील काकांनी जोपासला असल्याचे गौरवउद्गार काढत त्यांनी, असा मौलिक संदेश त्यांनी शेवटी दिला.
माणूस म्हणून जगताना स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता, निसर्ग संवर्धन आणि माणुसकी जोपासणे हेच खऱ्या अर्थाने तरुण पिढीचे कर्तव्य असल्याचे प्रा. किरण सगर यांनी स्पष्ट केले.
नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूम संचलित श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालय वर्धापन दिनाचे औचित्य साधून २५ वी 'राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे' आयोजन गुरुवारी (ता. २४) रोजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले. उद्घाटन दीपप्रज्वल व माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते. प्रमुख अतिथी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. किरण सगर, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, संस्थेचे संचालक प्रा. डॉ. सतीश शेळके, नगरसेवक गणेश अंबर, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे, परीक्षक प्रा. डॉ. अनिता मुदकण्णा, प्रा. डॉ. लक्ष्मण बिराजदार, प्रा. डॉ. सन्मुख मुच्छट्टे, प्रा. डॉ. सायबण्णा घोडके, समन्वयक प्रा. गोपाळ कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. "आधुनिक भारताचा विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यात समन्वय आहे/नाही" हा या स्पर्धेचा मुख्य विषय होता. याप्रसंगी आदर्श शिक्षक प्रा. डॉ. नरसिंग कदम तर आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी वीरभद्र बरबडे यांचा मानपत्र, शाल, पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते येथे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले आभार प्रा. डॉ. राम बजगिरे यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
