भूम, (प्रतिनिधी)- भूम नगरपालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सक्शन कम जेटिंग मशीनचे उद्घाटन नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील सांडपाणी व मलनिस्सारण वाहिन्यांची स्वच्छता, गटारे तुंबणे, पाइपलाइनमधील अडथळे दूर करणे तसेच सेप्टिक टँकची सफाई करण्यासाठी हे मशीन उपयुक्त ठरणार आहे. मशीनमध्ये सक्शन आणि जेटिंग अशा दोन प्रमुख यंत्रणा असून, व्हॅक्यूम पंपाच्या साहाय्याने गाळ, सांडपाणी व मलमिश्रित पदार्थ शोषून घेता येणार आहेत. तसेच उच्च दाबाच्या पाण्याच्या जेटद्वारे पाइपलाइनच्या आतील बाजूस साचलेला गाळ व घनकचरा दूर करून वाहिन्यांमधील प्रवाह सुरळीत करता येणार आहे.

या मशीनमुळे नागरिकांच्या ड्रेनेज व सांडपाणी व्यवस्थेबाबतच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करणे शक्य होणार आहे. तसेच सफाई कामगारांचा मलजलाशी थेट संपर्क कमी होऊन त्यांच्या सुरक्षिततेसह शहरातील आरोग्य व पर्यावरण संरक्षणास मदत होणार आहे. भूम शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने हे मशीन महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यावेळी सुरज गाढवे ,अभिजीत शेटे ,भाग्यश्री माने , रिमा शिंदे ,रुपेश शेंडगे ,अनिल शेंडगे ,आबासाहेब मस्कर,विठ्ठल बागडे,रामराजे कुंभार,नवनाथ रोकडे,दत्ता काळे ,गणेश वीर राहुल, पवार  अमोल,लोंढे या नगरसेवकासह  नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी नागरिक उपस्थित होते.

 
Top