तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे गायीवर बिबट्याने हल्ला केल्याची चर्चा असून, या हल्ल्यात गाय मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवार, दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.  घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

दरम्यान, वनविभागाने परिसरात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये अद्याप कोणत्याही प्राण्याची नोंद झालेली नाही. तसेच घटनास्थळी बिबट्याच्या पायांचे ठसेही आढळून आले नसल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे गायीचा मृत्यू नेमका बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाला का, याबाबत वनविभागाकडून तपास करण्यात येत आहे. घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी वनविभागाने परिसरात चार पथके दिवस-रात्र कार्यरत केली आहेत. वनकर्मचाऱ्यांकडून परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

याबाबत वनपरिमंडळ अधिकारी जे. एम. माळी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, सध्या घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. नागरिकांनी पूर्वीप्रमाणे आपापली दैनंदिन कामे निश्चिंतपणे व न घाबरता करावीत. तसेच कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. वनविभागाने सतर्कता वाढविल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


 
Top