धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील कार्ला, उंडरगाव,सलगरा, तोरंबा आणि खंडाळा या ग्रामीण भागातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या हातभट्टी, देशी, तसेच विदेशी दारूच्या बेकायदा विक्रीविरुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या परिसरातील अवैध दारूविक्री तातडीने बंद करून सखोल चौकशी करावी, अन्यथा एका महिन्याच्या आत धाराशिव येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर तीव्र स्वरूपाचा मोर्चा काढण्याचा इशारा पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या संदर्भातील सविस्तर निवेदन धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कार्ला, उंडरगाव, तोरंबा व खंडाळा शिवारात कोणत्याही प्रकारचा शासनमान्य परवाना नसताना ढाबे, टपरी आणि विविध अड्ड्यांवर बिनदिक्कतपणे दारूची विक्री केली जात आहे. या अवैध धंद्यांमुळे 19 ते 26 या वयोगटातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी गेली आहे.
अल्पवयातच तरुणांचे आरोग्य धोक्यात आले असून वयोवृद्ध नागरिकही या व्यसनाच्या विळख्यात सापडल्याने अकाली मृत्यूच्या दाढेत ओढले जात आहेत. घरातल्या कर्त्या पुरुषांना व्यसन जडल्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून महिला आणि बालकांचे हाल होत आहेत.
परिसरातील बेकायदा दारूविक्रेत्यांना ग्रामस्थांनी विचारणा केली असता, “आम्हाला कोणत्याही परवान्याची गरज नाही. आम्ही संबंधितांना अवैध धंद्याचे हप्ते देऊन व्यवसाय चालवतो. तुम्हाला जे करायचे ते करा, आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही,“ अशा प्रकारची अरेरावी आणि मुजोरीची भाषा विक्रेत्यांकडून वापरली जात आहे.
पोलीस अधीक्षकांनी स्वतःच्या स्तरावरून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि ग्रामीण भागातील नागरिक, तरुण व महिलांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.पुढील एका महिन्याच्या आत हे सर्व अवैध दारूचे धंदे कायमस्वरूपी बंद झाले नाहीत, तर ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमो)' पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर आरपीआय डेमोक्रॅटिकचे जिल्हाप्रमुख राज धज, महिला जिल्हाध्यक्षा सौ. बालिकाताई सूर्यवंशी, युवक प्रमुख अनिल वाघमारे, अल्पसंख्याक प्रमुख हाफीज धालुज यांच्यासह लक्ष्मण भोसले, रामभाऊ कांबळे, शारदा इंगळे, सुमन प्रभाकर जाधव, सुदाम सुरवसे आणि ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.