तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील मौजे धनेगाव-कुंभारी शिवारात शेतकऱ्यांच्या विहिरींवरील पाणबुडी मोटारी, वायर, किटकॅट व पाईप चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या असून शेतकरी हैराण झाले आहेत.

शनिवारी रात्री राजेंद्र इंगळे यांच्या शेतातील पाणबुडी मोटार, वायर व किटकॅट चोरीला गेले. तसेच विकास इंगळे, विकास जाधव यांच्यासह आणखी चार शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारींच्या वायरची चोरी झाल्याचे समोर आले आहे. एकीकडे पावसाने पाठ फिरवली, त्यामुळे शेतकरी विहिरीतील पाण्यावर पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता चोरट्यांनी विहिरींवरील मोटारी आणि साहित्यच लंपास केल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

“पाऊस पडत नाही, विहिरीतील पाणी पिकांना द्यायचं म्हटलं तर चोरटे सुधारू देत नाहीत.” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत असून, चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.


 
Top