तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरातील परिसरातील खडकाळ गल्ली येथे शुक्रवारी पहाटे 2 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास सायाळ सदृश्य वन्यप्राणी आढळून आल्याने परिसरात काही काळ कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात आलेल्या या प्राण्याला पाहून काही प्रत्यक्षदर्शींचे लक्ष त्याच्याकडे गेले. मात्र भाविकांची वर्दळ व हालचाल लक्षात येताच हा प्राणी काही काळ थांबून पुन्हा दशावतार मठाच्या मागील बाजूने परत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


रामदरा तलावातून मंदिर परिसरात आला असावा?

खडकाळ गल्ली परिसर रामदरा तलावाच्या जवळ असल्याने हा वन्यप्राणी तलाव परिसरातून किंवा लगतच्या झाडी-डोंगर भागातून दशावतार मठाच्या मार्गाने मंदिर परिसरात आला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अन्नाच्या शोधात रात्रीच्या वेळी भटकंती करणारा सायाळ मानवी वस्तीत किंवा शहरालगतच्या भागात दिसणे ही बाब फारशी असामान्य नसली तरी, मंदिर परिसरासारख्या गर्दीच्या ठिकाणी मध्यरात्री त्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले.


रात्री सक्रिय असतो सायाळ

सायाळला अनेक ठिकाणी साळिंदर किंवा साळू, तर इंग्रजीत  Porcupine असे म्हटले जाते. हा सस्तन प्राणी असून तो कुरतडणाऱ्या प्राण्यांच्या गटातील आहे. त्याच्या शरीरावरील लांब, कठीण काटे हे त्याचे प्रमुख संरक्षणाचे साधन आहे. धोका जाणवल्यास तो काटे फुलवून किंवा शेपटी हलवून समोरच्या प्राण्याला सावध करण्याचा प्रयत्न करतो. सायाळ हा प्रामुख्याने निशाचर प्राणी असल्याने रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतो. दिवसा तो बिळे, खडकांच्या कपारी किंवा सुरक्षित जागेत आश्रय घेतो. त्याचा आहार मुख्यतः गवत, पाने, मुळे, फळे, झाडांची साल आणि विविध वनस्पती असा असतो.


वन्यप्राणी दिसल्यास छेडछाड नको

मंदिर परिसरात किंवा शहरालगत सायाळसारखा वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी त्याच्या जवळ जाणे, त्याला हुसकावणे, दगड मारणे किंवा पकडण्याचा प्रयत्न करणे टाळणे गरजेचे आहे. वन्यप्राण्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासाकडे जाण्यासाठी मार्ग देणे आणि गरज भासल्यास वनविभागाला माहिती देणे हा योग्य पर्याय आहे. खडकाळ गल्ली परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या या सायाळच्या आगमनाची चर्चा परिसरात रंगली असून, रामदरा तलावालगतच्या परिसरातून हा प्राणी मंदिर परिसरात आला असावा, अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.


 
Top