तुळजापूर (प्रतिनिधी)- यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने तुळजापूर शहरातील उपलब्ध जलसाठे मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. अशा गंभीर पाणीटंचाईच्या परिस्थितीत श्री गणेश विसर्जनासाठी उपलब्ध जलसाठ्यांचा वापर करण्याऐवजी ‘श्री गणेश मूर्ती दान' अर्थात ‘देवदान' या अभिनव संकल्पना नगर परिषद आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला. याला मोठा प्रतिसाद शहरवासीयांसह सार्वजनिक गणेश मंडळांनी दिला.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे म्हणाले की, यावर्षी पाऊस अत्यंत कमी झाल्यामुळे तुळजापूर शहरातील उपलब्ध जलसाठे अत्यल्प आहेत. अशा परिस्थितीत या जलसाठ्यांमध्ये हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यास उपलब्ध पाण्याचा अनावश्यक वापर होण्याबरोबरच जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुळजापूर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने भविष्यात शहरासमोर आणखी मोठे पाणी संकट उभे राहू शकते. संकलित होणाऱ्या मूर्तींचा योग्य प्रकारे उपयोग करून भविष्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा प्रयत्न करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
रोटरी क्लब तुळजापूरचे अध्यक्ष अमर हंगरगेकर म्हणाले की, केवळ घरगुती गणेशमूर्तीच नव्हे, तर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनीही ‘देवदान' उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण आणि जलसंवर्धनाचा संदेश देण्याचे आवाहन त्यांनी केले. रोटरी क्लबचे सचिव संजॉय मैंदर्गे यांनी सांगितले की, ‘देवदान' अंतर्गत प्राप्त झालेल्या गणेशमूर्तींचे योग्य पद्धतीने जतन केले जाणार आहे. मूर्ती निर्माण करणाऱ्या कलावंतांच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार मूर्तींची पुनर्रचना व देखभाल करून त्या पुढील वर्षी गणेश मंडळांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या प्रसंगी नगर परिषदेचे अभियंता अतुल तोंडरे,चव्हाण प्रशांत, वैभव पाठक, मोठे,बापु रोचकारी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. रोटरी क्लबचे प्रशांत अपराध, भारत जाधव, स्वाती नळेगावकर, अमोल गुंड, बालाजी ढोबळे, संजय शिंदे, अर्जुन गवळी, पुष्कराज रोकडे, अभिषेक कदम, दयानंद हिबारे, तुषार सुत्रावे, संतोष लोखंडे, अर्जुन गवळी, पुष्कराज रोकडे यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहभाग घेतला.
