धाराशिव (प्रतिनिधी)-  केंद्र  किंवा राज्यात कोणाचीही सत्ता असली तरी यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षा, नीट परीक्षा पेपर याबरोबरच इतर नोकर भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे काही मंडळी पैशाच्या जोरावर संबंधितांना सातत्याने पैशाची लालच देऊन ते सर्व पेपर फोडण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे गरिबी परिस्थितीतून शिक्षण घेणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि नोकरी मिळविण्यासाठी विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या स्पर्धा परीक्षा व इतर सर्व परीक्षांचे पेपर हे ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घ्यावेत. पेपर फुटला तर त्याची जबाबदारी संबंधित मंत्री व अधिकारी यांचीच राहील. त्यामुळे पेपर फुटीला आळा घालण्यासाठी उत्तरदायित्व कायदा करावा. अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते बी. राजाराम यांनी केली.

धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बी. राजाराम म्हणाले की, पेपर फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही. वास्तविक पाहता सर्वसामान्यांच्या मतावर निवडून आलेले हे सरकार पेपर फुटणे यासारख्या गंभीर विषयाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर जनतेच्या भरवशाचा आदर करून जे सत्तेत बसलेत त्यांनी उत्तरदायित्व कायदा करावा. या कायद्याच्या माध्यमातून पेपर फुटीचे प्रकार घडल्यास संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई केल्यास यापुढे पेपर फुटीचे प्रकार निश्चितपणे थांबतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


 
Top