मुरूम (प्रतिनिधी)- येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची 17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रत्नमाला मंगल कार्यालयात शनिवारी (ता. 12) रोजी उत्साहात पार पडली. संस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत आगामी काळात संस्थेच्या वतीने 100 कोटी ठेवींचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प करण्यात आला.

प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले, ज्यास उपस्थित सभासदांनी सर्वसम्मती दिली.

चेअरमन शिवशरण वरनाळे यांनी प्रास्ताविकात 31 मार्च 2026 पर्यंतच्या ताळेबंद आणि नफातोट्याचा सविस्तर तपशील मांडला. त्यानुसार, चालू आर्थिक वर्षात पतसंस्थेस 36 लाख 26 हजार 806 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. संस्थेच्या ठेवी 15 कोटी 93 लाख 65 हजार 647 रुपये, कर्ज वाटप 12 कोटी 83 लाख 61 हजार 956 रुपये, गुंतवणूक 6 कोटी 23 लाख 92 हजार 693 रुपये, भाग भांडवल 1 कोटी 50 लाख 55 हजार 600 रुपये, सभासद संख्या 3858 इतकी आहे. संस्थेच्या स्थापनेपासूनच सातत्याने 'अ' वर्ग ऑडीट दर्जा मिळाला असून, संपूर्ण कामकाज संगणकीकृत आहे. तसेच संस्थेला सलग सहा वर्षापासून मानाचा विभागीय 'दीपस्तंभ' पुरस्कारही प्राप्त झाला असल्याचे त्यांनी सांगितले. 9 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संचालक मंडळाने भाग भांडवलावर 9 टक्के लाभांश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सभासदांचा हा लाभांश थेट त्यांच्या बचत खात्यात जमा होत असल्याने, ज्या सभासदांची बचत खाती अजून उघडी नाहीत, त्यांनी लवकरात लवकर खाती उघडून घ्यावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या सभेस उमरगा पंचायत समितीच्या सभापती आकांक्षा चौगुले, शिवसेना नेते भीमराव वरनाळे, चंद्रशेखर मुदकण्णा, आलूरचे जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब पाटील, उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव, तज्ञ संचालक विजय काशेट्टी, विलास जाधव, धनराज जाधव, राजेंद्र कारभारी, देवराज बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा याप्रसंगी  मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच मुरूम येथील आडत व्यापारी शरणप्पा पाताळे यांनी पतसंस्थेच्या ग्रंथालयास 51 पुस्तके भेट दिली. यावेळी  आकांक्षा चौगुले, देवराज बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक मंडळ, पतसंस्थेचे कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन जाधव तर आभार दत्ता इंगळे यांनी मानले. पंचक्रोशीतील बहुसंख्य सभासद, पदाधिकारी आणि नागरिक या सभेस उपस्थित होते.


 
Top