तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील वाढती पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती, जल जीवन मिशनची प्रलंबित कामे आणि महावितरणच्या वीज प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने नगरपरिषद नाट्यगृह, धाराशिव येथे विशेष आढावा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
या बैठकीस आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी प्रशासनाला सूचना देताना प्रत्येक गावाचा पाणीटंचाई आढावा घेऊन गावनिहाय कृती आराखडा तयार करावा, जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे कालबद्ध नियोजन करून तातडीने पूर्ण करावीत आणि महावितरणकडील पाणीपुरवठा योजनांच्या डीपीची प्रलंबित कामे व वीजपुरवठा सुरळीत करावा असे निर्देश दिले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती गोकर्णा गोपाळ कदम होत्या. यावेळी उपसभापती प्रमोद पाटील, माजी सभापती बालाजी गावडे, जिल्हा परिषद सदस्य संजय लोखंडे, दयानंद शिंदे, प्रवीण भद्रे, बाळासाहेब खांडेकर, व्यंकट पाटील, विनोद पाटील, मनोज रणखांब, अजित खापरे, नवनाथ नाईकवाडी, विद्या माने, गणेश एडके, पं.स. सदस्य घोगरे, प्रशांत रणदिवे, लिंबराज साळुंखे, निखिलेश पेठे, जगदीश विभुते यांच्यासह तालुक्यातील सरपंच, तहसीलदार मृणाल जाधव, गटविकास अधिकारी राजू कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी संतोष नलावडे, पाणीपुरवठा उपअभियंता नाईकनवरे, यांत्रिकी शाखा अभियंता शिंदे, मंडळाधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते.
