धाराशिव (प्रतिनिधी)- स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढीस लागतो असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश राऊत यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा पोलीस दल धाराशिव यांच्या सहकार्याने 30 दिवसीय स्वसंरक्षण विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे  सुरेश राऊत बोलत होते. 

सुरेश राऊत  म्हणाले की, मुलींनी आधुनिक युगात आज आपली लाजरी बुजरी प्रतिमा बाजूला सारून धाडसाने समाजात वावरणे गरजेचे आहे. स्वसंरक्षणामुळे आत्मविश्वासाबरोबरच शारीरिक क्षमता वाढीस लागतात. स्वतःचे आरोग्य व्यवस्थित रहात.े पण याचबरोबर विज्ञान युगात सोशल मीडियाचा वापर सुध्दा जपून आणि सावधानतेने करणे गरजेचे आहे. स्वसंक्षणाविषयीचा अभ्यासक्रम देखील मुलींसाठी असावा असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.

पोलीस उपनिरीक्षक पिंक पथक राकेश बनसोडे मार्गदर्शन करताना म्हणाले की,या प्रशिक्षणाचा उद्देश मुलांमधील आत्मविश्वास वाढविण्याबरोबरच आपल्या समोर अचानक एखादे संकट आले तर ते थोपवण्याचे धडे या अभ्यासक्रमात दिले गेले आहेत, प्रसंगावधान राखून संकटावर मात करण्यासाठी दिलेले प्रशिक्षण हे आयुष्यभर कामी येणार आहे.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभागप्रमुख जयप्रकाश पाटील यावेळी म्हणाले की, समाजात आज अनेक विकृत लोक वावरत आहेत,महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण आवश्यक आहे. 

आर्थिक गुन्हे शाखा धाराशिव येथील सहाय्यक उपनिरीक्षक अश्विनी जाधव विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,मुलींना जन्मापासूनच आपल्या समाजात संघर्ष करावा लागतो, आपणांस प्रत्येक संकटात आधार मिळणार नाही, त्यामुळे आपण स्वतःच स्वतःचा आधार बनण्याचा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ मंजुळकर यांनी प्रशिक्षणामुळे मुली स्वतःचे संरक्षण तर करतीलच पण आपल्या कुटुंबाचे देखील संरक्षण करतील, मुली आज कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत, स्वतःमधील न्यूनगंड दूर करुन धाडसाने मुलींनी आपल्या जीवनाचा प्रवास करावा असे अनमोल विचार  यावेळी मांडले. सदर कार्यक्रम रितू खोखर पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सक्षमीकरण कक्ष प्रमुख डॉ स्वाती जाधव यांनी केले.यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख प्रा. डॉ.मंगेश भोसले , महिला सक्षमीकरण कक्ष सह समन्वयक प्रा .शिल्पा डोळे, यांच्यासह सर्व महिला प्राध्यापिका,विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. माधुरी मगरे केले. तर कार्यक्रमाचे आभार डॉ शितल गायकवाड यांनी मानले.


 
Top