तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसिल कार्यालयावर ‘शेतकरी आक्रोश मोर्चास आरंभ झाला. छत्रपती शिवाजी चौक क्रांती चौक मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर येऊन येथे मागण्यांची निवेदन देण्यात आले.
या मोर्चात माजी अध्यक्ष ॲड. धिरज पाटील, जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल कुतवळ, नगरसेवक अक्षय परमेश्वर - कदम यांच्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
सौरऊर्जा कंपनीसाठी जमीन देण्यास नकार दिल्यानंतर शेतरस्त्याच्या प्रश्नावरून त्रस्त झालेल्या सुरतगाव येथील एका शेतकऱ्याने तुळजापूर तहसील कार्यालयाच्या गेटसमोर अंगावर राकेल होऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेने तहसील कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली.
सुरतगाव येथील कृष्णा भैरू गुंड यांनी सौरऊर्जा कंपनीला आपली जमीन दिली नसल्याचे सांगितले. दरम्यान, परिसरातील अन्य दोन शेतकऱ्यांनी जमीन दिल्याने पूर्वीचा सुमारे अर्धा किलोमीटरचा शेतरस्ता बंद झाल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक अंतराचा वळसा घालावा लागत असून शेती कसताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी यापूर्वी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. या प्रश्नावरून त्रस्त झालेल्या गुंड यांनी तहसील कार्यालय गाठले. कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर त्यांनी स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

