धाराशिव (प्रतिनिधी)- देशाची प्रगती सुदृढ आणि सशक्त युवकांवर अवलंबून आहे.त्यामुळे नशामुक्त युवा पिढी घडविणे ही काळाची गरज असून, देशाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा ‌‘मी देशासाठी काय करतो ही वृत्ती युवकांनी अंगीकारावी, असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी  होळकर यांनी केले.

माय भारत केंद्र,धाराशिव आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नशामुक्तीविषयक कार्यक्रमात ते बोलत होते.राष्ट्रपुरुषांची चरित्रे अभ्यासून युवकांनी आपल्या कृतीत सकारात्मक बदल घडवावा आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नशामुक्त युवा पिढी घडविण्याचा संकल्प केला.रील स्टार अजित शिंदे आणि अविनाश जाधव यांनी पथनाट्याद्वारे व्यसनांचे दुष्परिणाम मांडत नशामुक्तीचा संदेश दिला. विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य स्पर्धाही घेण्यात आली.विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य समीर शेख,राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक मोहन राठोड आणि मराठी विभागप्रमुख बी. व्ही.गोंदकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.वैभव आगळे आणि माय भारतचे समन्वयक वैभव लांडगे यांनी परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ.ए.के.मंजुळकर आणि माय भारतचे जिल्हा समन्वयक प्रतीक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


 
Top