भूम (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसाने मोठा खंड दिल्याने अनेक भागांत कोरड्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मंत्री, खासदार, आमदार तसेच लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करताना दिसत असले, तरी शासनाच्या पातळीवरून अद्याप नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला ठोस आदेश मिळाले नसल्याने प्रशासन यंत्रणा मात्र शांत असल्याचे चित्र आहे.

भूम तालुक्यात यंदा सुमारे 61 हजार एकर क्षेत्रावर खरीप हंगामाची तीन टप्प्यांत पेरणी करण्यात आली. यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक असून, उडीद, मूग, तूर आणि मका या पिकांचीही मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. सुरुवातीला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला. तालुक्यात तीन टप्प्यांत पेरणी झाल्यामुळे पिके वेगवेगळ्या अवस्थेत होती. काही ठिकाणी पिके फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच पावसाअभावी करपली, तर काही भागातील सोयाबीन, उडीद व मूग शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाचा खंड पडल्याने वाळून गेले. काही शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली होती; मात्र पेरणीनंतर काही दिवसांतच पाऊस गायब झाल्याने कोवळी पिकेही करपली आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन तर सोडाच, परंतु खरीप हंगामासाठी झालेला खर्चदेखील परत मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

पिकांना पाणी देण्यासाठी विहिरी, बोअर तसेच उपलब्ध सिंचन साधनांचा आधार घेण्याचा प्रयत्न काही शेतकऱ्यांनी केला. मात्र मोठ्या क्षेत्रावर पिके असल्याने सर्वच क्षेत्राला पाणी देणे शक्य झाले नाही. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान डोळ्यांसमोर दिसत असताना पंचनाम्यांसाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. शासनाने तातडीने प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश देऊन गावनिहाय प्रत्यक्ष पाहणी करावी. नुकसानग्रस्त क्षेत्राची अचूक नोंद घेऊन पात्र शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व पीकविमा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी भूम तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

 
Top