धाराशिव (प्रतिनिधी)-  तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धाराशिव येथील फार्मसी विभागातर्फे जागतिक फार्मसी दिन 2026 उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविध जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिजैविक प्रतिरोधाचा मुकाबला या विषयावर जनजागृती करण्यात आली. 

यावर्षीच्या फार्मासिस्ट दिनाची संकल्पना “स्वस्थ भारत : प्रतिजैविक प्रतिरोधाचा मुकाबला“ ही होती. प्रतिजैविकांच्या अयोग्य व अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिजैविक प्रतिरोधाच्या वाढत्या धोक्याबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

फार्मासिस्ट हा केवळ औषध देणारा व्यावसायिक नसून समाजाच्या आरोग्य व्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. प्रतिजैविक प्रतिरोध ही भविष्यातील गंभीर आरोग्यविषयक आव्हाने निर्माण करणारी समस्या आहे. ह्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा,रील मेकिंग स्पर्धा,लीफलेट/पत्रक निर्मिती स्पर्धा,साईटोन्स  स्पर्धा,हर्बेरियम मेकिंग स्पर्धा (औषधि वनस्पतींची माहिती) या निमित्तानेविविध स्पर्धांचे  आयोजन करण्यात आले आहे. 

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. स्मिता गवळी, सिव्हिल सर्जन, जिल्हा महिला रुग्णालय, धाराशिव या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रतिजैविकांच्या अयोग्य वापरामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिजैविक प्रतिरोधाबाबत मार्गदर्शन केले. फार्मसी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. पी. टी. माने यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष माझी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, महाराष्ट्र शासनाच्या मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त श्री. मल्हार पाटील, संस्थेचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे यांनी प्रतिजैविक प्रतिरोधाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. 

 
Top