तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 5 कोटी रुपयांची मदत करून दुष्काळग्रस्तांना हातभार लावावा, अशी मागणी माजी परिवहनमंत्री तथा माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी दि. 26 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांच्याकडे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात बाधित झाला असून रब्बी हंगामाबाबतही शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून आगामी काळात ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने यापूर्वीही आपत्कालीन परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केली आहे. अतिवृष्टी, भूकंप, दुष्काळ आदी नैसर्गिक आपत्तींच्या काळात संस्थानने मदतीचा हात पुढे केला असल्याचे चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या दुष्काळी परिस्थितीतही मंदिर संस्थानने 5 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देऊन दुष्काळ निवारणाच्या कामास सहकार्य करावे, अशी मागणी मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे. दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसमोर निर्माण झालेल्या संकटाच्या काळात मंदिर संस्थानकडून मदत मिळाल्यास त्याचा दुष्काळग्रस्तांना आधार मिळू शकतो, असेही त्यांनी निवेदनातून नमूद केले आहे.
