भूम/परंडा (प्रतिनिधी)- पुण्यात रात्रंदिवस एक करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या खासापुरी (ता. परंडा) येथील प्रथमेश दिलीप देशमुख (वय 25) या तरुणाने आर्थिक अडचणी आणि दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. भविष्याचे सुरेख स्वप्न डोळ्यांत बाळगणाऱ्या एका शेतकरी पुत्राचा असा शेवट होणे, हे संपूर्ण परिसराला सुन्न करून गेले आहे. प्रथमेशच्या पश्चात चार बहिणी आणि आई असा परिवार असून, वडिलांचे छत्र आधीच हरपले होते. कुटुंबातील एकुलत्या एक मुलाच्या अशा जाण्याने देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अत्यंत क्लेशदायक आणि दुःखाच्या प्रसंगी आमदार कैलास पाटील यांनी खासापुरी येथे देशमुख कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली. पाटील यांनी भावूक होत प्रथमेशच्या आईला व कुटुंबीयांना धीर दिला आणि “या कठीण काळात आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत,“ असा विश्वास दिला. तसेच याप्रसंगी देशमुख कुटुंबीयांना वैयक्तिक स्वरूपात आर्थिक सहकार्यही सुपूर्द करण्यात आले.
या सांत्वनपर भेटीदरम्यान प्रथमेशची आई, दाजी काकासाहेब घाडगे, शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील, राकेश सूर्यवंशी, माजी सरपंच शंकर चव्हाण, बालाजी देशमुख, सचिन देशमुख यांच्यासह खासापुरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी पुत्रांच्या आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अशा आत्महत्या थांबवण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचा सूर यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला.