तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील शेतकरी गुणवंत गणपत क्षीरसागर (वय 45) यांनी दुष्काळ व नापिकीला कंटाळून 7 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. या घटनेची माहिती माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांना मिळाल्यानंतर त्यांनी क्षीरसागर कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत जाहीर केली. या मदतीचा धनादेश आज सिंदफळ येथे जाऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी क्षीरसागर कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी कुटुंबीयांना या कठीण प्रसंगी धीर देण्यात आला.

दुष्काळाचे संकट असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता या संकटाचा सामूहिकपणे सामना करावा. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. शेतकऱ्यांना अर्ध्या रात्रीही मदतीची गरज भासल्यास मदतीसाठी आपण कायम तत्पर असल्याचे आवाहन आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केले. धनादेश सुपूर्द करतेवेळी कृषी उत्पन्न बाजार समिती भूमचे सभापती प्रवीण देशमुख, माजी युवासेना जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, तुळजापूरचे युवा नेते ओम जगदाळे, दिगंबर गव्हाणे, शंभू मनगिरे, राहुल शिंदे, याकूब इनामदार, मनोज क्षीरसागर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top