धाराशिव (प्रतिनिधी)- पावसाच्या अनिश्चिततेमुळे भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या चारा टंचाईच्या काळात जिल्ह्यातील पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये,यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजनाला सुरुवात केली आहे.शेतात आणि साखर कारखाना परिसरात उपलब्ध होणाऱ्या उसाच्या वाढ्यांचा चाऱ्यासाठी उपयोग करण्याबरोबरच उपलब्ध निकृष्ट चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.त्यासाठी उसाच्या वाढ्यांचे संकलन व साठवणूक,चारा डेपोची निर्मिती आणि कोरड्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया अशा उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
जिल्ह्यातील संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभाग,कृषी विभाग आणि साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी पुजार बोलत होते. टंचाईच्या काळात जनावरांना पुरेसा आणि सकस आहार उपलब्ध व्हावा,यासाठी उपलब्ध चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याबरोबरच पर्यायी चारा निर्मितीच्या उपायांचा अवलंब करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीला जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे,पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.दीपक मुळे,लातूरचे प्रगतशील पशुपालक रामभाऊ हांडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ऊसतोडणीनंतर उपलब्ध होणारे हे वाढे वाया जाऊ न देता साखर कारखाना स्तरावर त्यांचे संकलन व साठवणूक करावी आणि भविष्यातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन त्यातून चारा डेपो उभारावेत,अशा सूचना साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या. पारंपरिक चाऱ्याबरोबरच पर्यायी चारा निर्मितीच्या तंत्रज्ञानाचा पशुपालकांनी उपयोग करावा, यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती सभापती भाऊसाहेब खरसडे यांनी दिली. चारा उपलब्ध असला तरी त्याचे पोषणमूल्य कमी असेल तर त्याचा पशुधनाला अपेक्षित फायदा मिळत नाही. त्यामुळे गव्हाचा भुसा,भाताचा पेंढा आणि ज्वारीचा कडबा यांसारख्या निकृष्ट चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी करता येणाऱ्या युरिया प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रगतशील पशुपालक रामभाऊ हांडगे यांनी बैठकीत करून दाखविले. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.दीपक मुळे यांनी युरिया प्रक्रियेचे फायदे स्पष्ट केले.