उमरगा (प्रतिनिधी)-  उमरगा तहसील कार्यालयात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले. मराठा योद्धा अण्णासाहेब पवार यांनी तहसीलदारांची खुर्ची अचानक ताब्यात घेतली. कार्यालयातून बाहेर आणली व ती पेटवून दिली. यावेळी एक मराठा, लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दणाणून होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चार आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले असुन त्यांच्या विरोधात उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करुन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असुन उपोषणाचा 12 वा दिवस आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता, सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी जाणार नसल्याचे म्हटले आहे. यामुळे मराठा समाजात मोठी अस्वस्थता पसरली असून मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी केली जात आहे. बुधवारी (दि.9) मराठा तरुण आण्णासाहेब पवार व इतर कार्यकर्त्यांनी उमरगा तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार यांची खुर्ची ताब्यात घेतली. खुर्चीवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली. खुर्ची जळत असताना आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा, मनोज जरांगे पाटील आगे बढो आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आण्णासाहेब गोविंदराव पवार, महादेव गोविंद माने, विठ्ठल दशरथ पवार रा. तिघेही नाईचाकुर (ता. उमरगा) व वैजिनाथ आबा काळे रा. माडज (ता. उमरगा) या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. नायब तहसीलदार गजानन पारीसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या चौघांविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान तहसील कार्यालय परिसर, शहर व तालुक्यात परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


 
Top