परंडा (प्रतिनिधी)-परंडा तालुक्यातील खासापुरी येथील प्रथमेश दिलीप देशमुख या एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने पुणे येथे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परंडा तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील मानसिक व आर्थिक ताणाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश देशमुख हा काही दिवसांपूर्वी आपल्या गावी आला होता. त्यावेळी घरातील परिस्थिती पाहून तो मानसिक तणावात असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. घराची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना स्पर्धा परीक्षेची तयारी, भविष्यातील आर्थिक खर्च आणि करिअरची चिंता यामुळे तो तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रथमेशचे वडील हयात नसून, आई आणि पाच बहिणी असा त्याचा परिवार असल्याची माहिती समोर आली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्याने एमपीएससीची तयारी सुरू ठेवली होती. मात्र, परीक्षेतील अनिश्चितता आणि भविष्यातील आर्थिक जबाबदाऱ्यांचा विचार त्याला सतावत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
एमपीएससी परीक्षेतील पेपर फुटीच्या चर्चेमुळेही विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. आपण केलेली मेहनत, अभ्यास आणि तयारी यानंतरही परीक्षा प्रक्रियेबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नांमुळे भविष्यात काय होणार, अशी चिंता प्रथमेशला होती, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आली आहे.
या सर्व परिस्थितीतून निर्माण झालेल्या नैराश्यातून प्रथमेशने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. पुणे येथे आज सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.