भूम (प्रतिनिधी)- रविंद्र हायस्कूल, भूम येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत 14 वर्षे वयोगटात तसेच 17 वर्षे वयोगटात तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, एकाग्रता, संयम आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर हे घवघवीत यश संपादन केले.
दोन्ही वयोगटातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेतील विविध डावांमध्ये आत्मविश्वासाने खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. 14 वर्ष वयोगटात अनुष्का कुंभार, समृद्धी कांबळे, आराध्या बोराडे, आरोही शेंडगे, संस्कृती सुपेकर तर 17 वर्ष वयोगटात श्रद्धा चव्हाण, ज्ञानेश्वरी दुधाळ, स्वराली करगळ, प्रणव तमांचे, समर्थ रेवडकर, किंशुक गेडाम या विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, क्रीडा विभाग, पालक तसेच विद्यार्थी यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासाठी संस्थेचे सचिव आर डी सुळ, मुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे, अमर सुपेकर हे उपस्थित होते.
