धाराशिव (प्रतिनिधी)- दुष्काळाच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करावे.या संकटाच्या काळात राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा निर्णय घेतला असून,येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिली.

धाराशिव तालुक्यातील करजखेडा आणि कळंब तालुक्यातील मलकापूर येथे शेतातील नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते. दुष्काळाची परिस्थिती सरसकट असल्याने मदतही सरसकट देण्यात येणार आहे. केंद्र सरकारची एनडीआरएफ चे मदत मिळण्यासाठी पंचनामे कायदेशीर प्रक्रियेनुसार करावे लागतील.मात्र,परिस्थिती सरसकट असल्याने मदतीचा निर्णयही सरसकटच असेल,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या काळात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा,मुलांचे शिक्षण आणि अन्नधान्य यांची व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल.शेतकऱ्यांना देण्यात येणारे थेट अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे,असे त्यांनी सांगितले. तसेच करजखेडा येथील कोरड्या पडलेल्या साठवण तलावाची पहाणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधीची कमतरता पडणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून, सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत कर्जमाफी सुरू राहील,असे मुख्यमंत्री म्हणाले.शेतकऱ्यांच्या वीजबिलापोटी 48 हजार कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळाच्या या संकटात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे,ही सरकारची भूमिका आहे.असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील, आमदार बसवराज पाटील, राणाजगजीतसिंह पाटील, कैलास पाटील,प्रवीण स्वामी, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, ज्ञानराज चौगुले, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


 
Top