धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील मलकापूर येथे मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि सत्ताधारी भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. जिल्ह्यात 'कोरडा दुष्काळ जाहीर करा' अशी मागणी करत ठाकरे गटाचे लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोरच जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने दौऱ्यात गोंधळ पाहायला मिळाला.
मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत असतानाच, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह आलेल्या शेतकऱ्यांनी दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. विरोधकांकडून घोषणाबाजी सुरू होताच सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर देत घोषणा देण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पाहणीच्या ठिकाणी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्र्यांनी मात्र या घोषणाबाजीकडे दुर्लक्ष करत आपला दौरा पुढे सुरू ठेवला.
वातावरण चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. या गोंधळादरम्यान मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन संतप्त शेतकरी व आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
“आम्ही दुष्काळाच्या भीषण परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आमचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी घोषणाबाजी केली.“
-कैलास पाटील, आमदार (ठाकरे गट)
“सध्याची परिस्थिती ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आहे, अशा संवेदनशील विषयावर राजकारण करण्याची ही वेळ नाही.“
- प्रताप सरनाईक, पालकमंत्री
