धाराशिव   (प्रतिनिधी)- आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने पापनाश नगर येथे ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी व पारधी समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी आदिवासी प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांनी शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यामध्ये घरकुल योजना, महिला बचत गट योजना, दुधाळ म्हैस योजना, सुशिक्षित बेरोजगारांसाठीच्या योजना, भूमिहीनांसाठी स्वाभिमान सबलीकरण योजना तसेच शेतमजुरांसाठीच्या स्वाभिमान योजनांचा समावेश होता. संबंधित योजनांसाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी करावयाची प्रक्रिया याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

शासनाच्या अनेक योजना समाजातील गरजू घटकांसाठी राबविण्यात येत आहेत. मात्र, योजनांची पुरेशी माहिती नसल्यामुळे काही पात्र लाभार्थी त्यापासून वंचित राहतात. त्यामुळे अशा अभियानांच्या माध्यमातून योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांनी आपल्या भाषणातून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम असून, पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मुलांना शाळेत पाठविण्यासोबतच त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बापू पवार,दादा पवार, चंदू पवार, छनछन पवार यांच्यासह पारधी समाजातील शेकडो बांधव उपस्थित होते. अभियानादरम्यान नागरिकांनी विविध योजनांबाबत माहिती जाणून घेतली तसेच आपल्या अडचणी व प्रश्न अधिकाऱ्यांसमोर मांडले. संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना मार्गदर्शन करून योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन केले. सेवा संकल्प अभियानामुळे शासनाच्या योजना आणि त्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती झाली. विशेषतः आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना स्वावलंबी बनविण्यासाठी उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

 
Top