भूम (प्रतिनिधी)- येथील तालुका क्रीडा संकुलात बुधवार, दि. 24 रोजी झालेल्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत शंकराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये यशोदीप कांबळे याने लांब उडीमध्ये प्रथम, तर गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. आदित्य जगदाळे याने 100 मीटर धावण्यात द्वितीय, तर 200 मीटर धावण्यात प्रथम क्रमांक पटकाविला. माऊली गायकवाड याने 3 हजार मीटरमध्ये प्रथम, तर 1 हजार 500 मीटरमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. ओंकार बेरगळ याने तिहेरी उडी, थाळीफेक व लांब उडी या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळविला. शुभम शिंदे याने गोळाफेक, 400 मीटर व 800 मीटर या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकाविला. पृथ्वीराज हसवले याने 1 हजार 500 मीटर धावणे तसेच 5 किलोमीटर चालणे या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळविला.

या यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा. एम. जी. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडाशिक्षक प्रा. एम. जी. सूर्यवंशी, प्रा. एस. ए. टोंगारे, प्रा. व्ही. आर. माने, प्रा. जी. सी. काळे, पर्यवेक्षक प्रा. आर. डी. सोळंके यांच्यासह यशस्वी विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.


 
Top