धाराशिव (प्रतिनिधी)- सरकारने 75 टक्के दुष्काळ जाहीर केला आहे. तो दुष्काळ पेपर न ठेवता तातडीने मदत देणे महत्वाचे आहे. परिस्थिती अत्यंत वाईट आहे. गेल्या वर्षी केलेल्या घोषणेपैकी किती घोषणांची अंमलबजावणी झाली असा प्रश्न उपस्थित करून, बळीराजाच्या जखमेवर फसव्या घोषणेचा मुलांमा नको तातडीने मदत करा असे मत शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत असून, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आता विरोधी पक्षाकडून देखील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत आहे. शनिवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे धाराशिव दौऱ्यावर होते. तुळजापूर तालुक्यातील खानापूर आणि आष्टामोड येथे आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांची अवस्था पाहताना मनात कापरे भरत असल्याचे सांगत शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. शिवसेना पक्ष शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र म्हणून त्यांच्या पाठीशी उभा आहे. कोणत्याही बँकेकडून कर्जवसुलीच्या नोटिसा दिल्या जात असतील तर संबंधित बँकेचे नाव शिवसेनेच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना थेट कळवा. त्या बँकांना आम्ही सरळ करू, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
यावेळी मोहम्मद अल्ताफ बेग याने सोयाबीन गेलं त्यामुळे वडील नैराश्य मध्ये आहेत. त्यांनी घरी आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असे म्हणत आहेत. त्यामुळे रात्री आपरात्री मी त्यांच्या सोबत असतो. असे आपबिती आदित्य ठाकरे यांना सांगितली. यावेळी खानापूर परिसरात काही शेतकऱ्यांनी निवेदने दिली. तर आष्टा मोड परिसरात महिला शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेवून दुष्काळाचे वासत्व मांडले. दौऱ्यात विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे, शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते. खानापूर येथील पाहणीनंतर आदित्य ठाकरे हे लोहारा तालुक्यातील आष्टा मोड परिसरातील दुष्काळग्रस्त भागाचीही पाहणी ठाकरे यांनी केली आहे.


