तुळजापूर (प्रतिनिधी)- एका शेतकऱ्याने हातात सोयाबीनच्या शेंगा दिल्या “साहेब, या फोडून बघा,” एवढेच तो म्हणाला. शेंगा फोडल्या; मात्र आत दाणाच नव्हता! एकरी तब्बल 25 हजार रुपये खर्च करून उभे केलेले पीक हातातून गेल्याची ही एका शेतकऱ्याची कहाणी. दुसऱ्या बाजूला मुलाच्या शाळेच्या फीचे पैसे नाहीत, घरात औषधोपचारासाठी पैसे नाहीत आणि जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न उभा आहे. अशा परिस्थितीत एका चिमुकल्याने, “साहेब, माझ्या वडिलांची मला काळजी वाटते; मी काय करू?” अशी व्यथा मांडली आणि खानापूरच्या शेतात क्षणभर सगळे वातावरणच स्तब्ध झाले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या ऐकल्या. 26 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या त्यांच्या दोन दिवसीय दुष्काळ पाहणी दौऱ्यात खानापूरचा समावेश होता. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हात जोडून त्यांना धीर दिला. “शेतकऱ्यांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. धीर खचू देऊ नका. स्वतःचे बरे-वाईट करण्याचा किंवा आत्महत्येचा प्रयत्न करू नका. असा विचारही मनात आणू नका,” असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सांगताना कर्जमाफी, पीकविमा, बँकांच्या नोटिसा आणि शेतीतील वाढता खर्च याकडे लक्ष वेधले. “पूर्वीची कर्जमाफी अद्याप मिळालेली नाही. विम्याचे पैसे मिळत नाहीत. कर्जमाफीच्या घोषणा होतात; मात्र प्रत्यक्ष लाभ मिळत नाही. उलट बँकांकडून नोटिसा येत आहेत,” अशा तक्रारी शेतकऱ्यांनी मांडल्या. एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील सोयाबीन ठाकरे यांच्या हातात ठेवले. “साहेब, पीक हिरवे दिसते; पण आता दाणाच नाही,” असे सांगत त्याने सोयाबीनच्या शेंगा फोडून दाखवण्यास सांगितले.


शेंगा फोडल्यानंतर दाणे नसल्याचे त्याने दाखवले. त्यानंतर त्याने आपली व्यथा मांडली

“एकरी पंधरा हजार रुपये खर्च आला. आता शेतातून एक पैसाही मिळणार नाही. वर्षभर जगायचे कसे? लेकरांच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे? औषधोपचार कसे करायचे? मुला-मुलींची लग्ने कशी करायची? रब्बीची पेरणी कशी करायची?” या प्रश्नांमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाची तीव्रता समोर आली. शेतकऱ्यांनी केवळ स्वतःच्या मदतीची मागणी केली नाही, तर पशुधनाच्या चारा-पाण्याचाही प्रश्न ठाकरे यांच्यासमोर मांडला. “साहेब, आमचं राहू द्या; पण मुक्या जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आम्हाला चारा छावण्या नकोत, आमच्या बांधावर चारा आणून द्या,” अशी मागणी एका शेतकऱ्याने केली.“शासनाने तातडीची आर्थिक मदत दिली तरच आम्ही पुन्हा उभे राहू शकतो,” अशी भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली.


चिमुकल्याने सांगितले ‌‘साहेब, बाबांची मला भीती वाटते!'

याच संवादादरम्यान सय्यद बेग हा चिमुकला आपल्या वडिलांसोबत तेथे आला होता. आदित्य ठाकरे यांनी त्याला जवळ बोलावून, “बाळा, काय झाले? असा रडका चेहरा का करतोस?” अशी विचारणा केली. त्यावर मुलाने डोळ्यांत पाणी आणून वडिलांच्या आर्थिक अडचणींची व्यथा सांगितल्याने उपस्थित वातावरण गहिवरले.

मुलाच्या वडिलांनी सांगितले की, शेतात उत्पन्न झालेले नाही. मुलगा शाळेच्या फीचे पैसे मागतो; मात्र पैसे नसल्याने त्याला काय उत्तर द्यायचे, हा प्रश्न पडतो. परिस्थितीच्या ताणातून केलेल्या एका विधानाचा मुलाच्या मनावर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. “आता माझा मुलगा सतत माझ्यासोबत राहतो. रात्री मी अचानक उठलो तरी तो घाबरून उठतो. शाळेत जा म्हटलं तर नको म्हणतो. शेतात चल म्हटलं तर ‌‘बाबा, मीही तुमच्यासोबत येतो' म्हणतो. माझ्या मनात काय चालले आहे, याची त्याला सतत भीती वाटते. साहेब, मी काय करू, मला कळत नाही,” अशी व्यथा त्यांनी मांडली. खरीप हंगाम हातातून गेल्याने उपचारासाठीही पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले. “अडीच महिन्यांपासून उपचारासाठी पैसे नाहीत. आम्ही कसेबसे जगू; पण जनावरे कशी जगणार?” असा सवाल त्यांनी केला.


‌‘दुष्काळावर राजकारण नाही; शेतकऱ्यांच्या सोबत राहणार'

शेतकऱ्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण न करण्याची भूमिका मांडली. “आम्ही जमिनीवर आहोत आणि शेतकऱ्यांच्या सोबत राहणार आहोत,” असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष काय मदत मिळणार आहे, हे स्पष्टपणे सांगून त्यांना धीर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकण्यासाठी आणि त्यांच्या सोबत उभे राहण्यासाठी आपल्याला पाठवले असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. दुष्काळाचा परिणाम केवळ शेतीवर नाही, तर ग्रामीण भागातील रोजगार आणि अन्य क्षेत्रांवरही होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्राकडील निधीचा वापर करण्याबाबत प्रश्न उपस्थित करत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही त्यांनी केली.


कर्जमाफीच्या नोटिसांवरून सरकारला सवाल

कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे सांगितले जात असतानाही बँकांकडून नोटिसा येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यांना त्रास देणे थांबवावे, अन्यथा शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलनात्मक भूमिका घेईल, असा इशारा त्यांनी दिला. दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शेतीसोबत पर्यावरणाकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जंगलतोड रोखणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.


बांधावर बसून ऐकली ‌‘दुष्काळाची खरी कहाणी'

यावेळी अंबादास दानवे, सुषमा अंधारे, आमदार कैलास पाटील, आमदार स्वामी नंदूराजे निंबाळकर जि प सदस्य जितेंद्र कानडे, संजय निंबाळकर, शामल पवार, श्याम पवार, सुधीर कदम, राज अहमद पठाण, धुळापर राक्षे, सुनील जाधव, जगन्नाथ गवळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. खानापूरच्या शेतात जमिनीवर बसून शेतकऱ्यांच्या समस्या ऐकताना दाणेविरहित सोयाबीन, कर्जाच्या नोटिसा, मुलांच्या शिक्षणाची फी, उपचाराचा खर्च आणि जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न या सगळ्या समस्या एकाच वेळी समोर आल्या.

अलीकडील स्थानिक वृत्तांतही तुळजापूर परिसरात पावसाच्या खंडामुळे सोयाबीन पिकांवर गंभीर परिणाम झाल्याचे आणि शेतकरी आर्थिक संकटात असल्याचे नमूद झाले आहे. खानापूरच्या बांधावर त्या दिवशी दुष्काळाची केवळ पाहणी झाली नाही; तर ‌‘पीक गेले, उत्पन्न गेले, आता जगायचे कसे?' या प्रश्नाची थेट कहाणी ऐकायला मिळाली.

 
Top