धाराशिव/तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात दीड हजार गणेश मंडळाने उत्साहात श्री गणेशाची स्थापना केली आहे. विघ्नहर्ता श्री गणरायाचे आगमन गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच सुरु झाले ते सोमवार सायंकाळपर्यंत सुरूच होते. विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे गणराय ढोल-ताशांच्या गजरात व मिरवणुकीने गणेशमूर्ती मंडळांच्या मंडपात आणण्यात आल्या. तसेच तीर्थक्षेत्र तुळजापुरात गणपती बाप्पांचे आगमन पारंपारिक पद्धतीने सोमवार दि.14 सप्टेंबर रोजी झाले. यंदाचा गणेशोत्सवावर दुष्काळाच्या सावट दिसून आले.
जिल्ह्यात श्री गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भव्य-दिव्य स्वरूपात साजरा केला जातो. यंदाही सार्वजनिक गणेश मंडळांनी आकर्षक आणि उंचच उंच गणेशमूर्तींची निवड केली आहे. विविध आकार, आकर्षक कलाकुसर आणि देखणे रूप असलेल्या गणेशमूर्ती यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी सोलापूर, धाराशिव परिसरातून गणेशमूर्ती आणल्या आहेत. गणरायाच्या आगमनावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मंडळांच्या मंडपांमध्ये मूर्ती दाखल झाल्यानंतर सजावट, विद्युत रोषणाई आणि प्रतिष्ठापनेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तरीही विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाचा उत्साह कायम ठेवत सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सवासाठी कंबर कसली आहे. दुष्काळाच्या संकटातून लवकर मुक्ती मिळावी, चांगला पाऊस पडावा आणि शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात, अशी भावना गणेशभक्तांमध्ये व्यक्त होत आहे.
नाटक, संस्कृती कार्यक्रमांची परंपरा हरवली
तुळजापुरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला पूर्वी समृद्ध सांस्कृतिक परंपरा होती. गणेश मंडळांच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळत असे. नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन-कीर्तन आणि विविध कलाविष्कार यामुळे गणेशोत्सवाला सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले होते. काळ बदलत गेल्याने गणेशोत्सवातील मेळे, नाटकांची परंपरा आता हरवली आहे.
