परंडा (प्रतिनिधी)- जि.प.उर्दू प्रशाला, परंडा येथील अराजपत्रित मुख्याध्यापक खतीब ए.ए.यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शाळेच्या वतीने सहपत्नीक सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाल, श्रीफळ, फेटा व भेटवस्तू देऊन त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परंडा केंद्राचे केंद्रप्रमुख नितीन बोराडे होते.कार्यक्रमाची प्रस्तावना जमील बांगी यांनी केली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी कुरेशी शिफा व पठाण मिस्बा यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून खतीब सरांच्या प्रदीर्घ शैक्षणिक व सेवाभावी कार्याचा गौरव केला.त्यांच्या कार्याची प्रशंसा करताना पुढील निवृत्तीचे आयुष्य सुख, समाधान, उत्तम आरोग्य व आनंदाने जावो, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.सत्काराला उत्तर देताना खतीब ए.ए.यांनी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व सहकाऱ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीना दखनी, यास्मिन सय्यद, यास्मिन पंजेशा, रुकसाना बिजापुरे, शबाना काजी, नितीन लोधवाल, महेंद्र शिंदे आणि अंजली चंदनशिवे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समीना दखनी मॅडम यांनी केले. या सत्कार समारंभास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
