धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि बृहन्महाराष्ट्र योग परिषद यांच्या अधिपत्याखाली बुलढाणा जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने बुलढाणा येथे आयोजित वरिष्ठ गटातील योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचे योगपटू सतीश साबळे यांनी दमदार कामगिरी करत कास्यपदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्यांची आगामी राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या योगपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात सतीश साबळे यांनी आपल्या कौशल्यपूर्ण आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर कास्यपदकाची कमाई केली. त्यांच्या या यशामुळे धाराशिव जिल्ह्याच्या योगासन क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सतीश साबळे यांच्या या यशाबद्दल धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल अजमेरा, उपाध्यक्ष गौरव बागल व स्वाती लाकाळ, सचिव स्वाती गडदे, सहसचिव राजेश बिलकुले व योगेश थोरबोले, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, सदस्य रामकृष्ण खडके, रामेश्वर सावंत, प्रणाली जगदाळे, अश्विनी जाधव, इंदुमती जाधव आदींसह संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू व योगप्रेमींनी अभिनंदन केले असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही सतीश साबळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राच्या संघाच्या यशात मोलाची भर घालावी, अशी अपेक्षा धाराशिवच्या क्रीडा व योगासन क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
