धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील फार्मसी विभागाच्या वतीने दरवर्षी चांगल्या संख्येने विद्यार्थी जीपॅट व नायपर परीक्षा उत्तीर्ण होतात. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू असतात. याचाच भाग म्हणून दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, उस्मानाबाद (धाराशिव) येथील फार्मसी विभागाच्या वतीने बी. फार्मसी विद्यार्थ्यांसाठी जीपॅट ( ग्रॅज्युएट फार्मसी एपटीट्यूड टेस्ट ) व नायपर ( नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च) प्रवेश परीक्षेबाबत विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या मार्गदर्शन सत्रासाठी ॲकॅडमी ऑफ फार्मसी ॲस्पायरंट्स चे संस्थापक श्री. औदुंबर शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून होते.
औदुंबर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना जीपॅट व नायपर परीक्षेचे स्वरूप, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, विषयांचे महत्त्व तसेच परीक्षेत यश मिळविण्यासाठी आवश्यक अभ्यासपद्धती व नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करताना सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य वेळेचे नियोजन, संकल्पनांची स्पष्टता, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव आणि नियमित चाचण्यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने यांनी विद्यार्थ्यांना बी. फार्मसीनंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधी व योग्य करिअर निवडीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जीपॅट परीक्षेचे उच्च शिक्षण व करिअरच्या दृष्टीने असलेले महत्त्व स्पष्ट करताना, संस्थेतील विद्यार्थ्यांनी यापूर्वी जीपॅट सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये प्राध्यापकांच्या मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण व कठोर परिश्रमाच्या जोरावर मिळविलेले यश विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण म्हणून मांडले.
विद्यार्थ्यांचा सहभाग व लाभ
या मार्गदर्शन व्याख्यानाचा सुमारे 96 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. विद्यार्थ्यांना जीपॅट व नायपर परीक्षेच्या तयारीसाठी योग्य दिशा, अभ्यासाचे नियोजन आणि परीक्षेतील यशासाठी आवश्यक रणनीती याबाबत उपयुक्त माहिती मिळाली. या कार्यक्रमाचे आयोजन फार्मसी विभागप्रमुख डॉ. प्रीती माने आणि जीपॅट समन्वयक प्रा. ए. आय. काझी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. आर. एस. हिंगमिरे, प्रा. डी. बी. भोजने आणि प्रा. पी. डी. गायकवाड यांनी केले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शन सत्रामुळे जीपॅट व नायपर सारख्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होऊन उच्च शिक्षणाच्या दिशेने त्यांना निश्चितच प्रेरणा मिळाली.
