भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने मोठी उघडीप दिल्याने खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस यासह विविध पिकांवर गंभीर परिणाम झाला असून, शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेले सोयाबीनचे पीक पाण्याअभावी करपून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय, भूम येथे निवेदन देऊन विविध मागण्या केल्या. पावसाच्या खंडामुळे तालुक्यातील अनेक गावांतील शेतशिवारातील पिकांची वाढ खुंटली असून, हाताशी आलेले पीक पाण्याअभावी वाळत आहे. परिणामी यंदाच्या खरीप उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे, खते व औषधांची जुळवाजुळव करून पेरणी केली. मात्र पेरणीनंतर पावसाने दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत मोठी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. वाढता उत्पादन खर्च, बियाणे व औषधांची थकीत बिले आणि बँक कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी शेतकरी संतोष सुपेकर, रघुनाथ वाघमोडे, प्रभाकर डोंबाळे, मधुकर अर्जुन, रंजीत हापटे, समाधान बनसोडे, नवनाथ टकले, अमोल मिसाळ, सुदाम पाटील, महादेव वडेकर, सुभाष देवकते, आनंद ठोंबरे, बिबीशन देवकते यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
