भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, भूम येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांसह विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण दिले. आपत्तीच्या प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखून स्वतःचा तसेच इतरांचा जीव कसा वाचवावा, याबाबत पथकाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी भूकंप, पूर, आग, इमारत दुर्घटना यांसारख्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी घ्यावयाची दक्षता, आपत्तीपूर्व तयारी, बचावकार्य आणि आपत्तीनंतरच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून बचावकार्य कसे करावे, याचे प्रात्यक्षिकही एन.डी.आर.एफ.चे इन्स्पेक्टर नितीन सोकाशी व त्यांची संपूर्ण टीम यांनी करून दाखवले.
विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण होऊन संकटाच्या प्रसंगी धैर्याने व जबाबदारीने कार्य करण्याचा आत्मविश्वास वाढला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गंगाधर काळे तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
