तेर (प्रतिनिधी)- कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी शास्त्रज्ञ संवाद अंतर्गत व बायफ बी आई एस एल डी यांच्या मार्फत घरडा प्रकल्पांतर्गत दुग्ध व्यवसाय व पशुधन व्यवस्थापन विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर येथे आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणाचा लाभ धाराशिव जिल्ह्यातील हाडोंग्री, तुगाव, मुळेवाडी, चिखली, जुनोनी व लातूर जिल्ह्यातील मुरुड या सहा कृत्रिम रेतन केंद्रांतील एकूण 65 पशुपालकांनी घेतला.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. श्रीकृष्ण झगडे यांनी पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. अरबाड यांनी शेती व चारा व्यवस्थापनाची माहिती दिली. डॉ. वैभव पाटील, पशुधन विकास अधिकारी यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध शासकीय योजना, त्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया तसेच जनावरांमधील वंध्यत्व निवारणाबाबत मार्गदर्शन केले. मानवलोकचे शिधराज चौधरी यांनी मानवलोक व घरडा यांच्या माध्यमातून पशुपालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. श्री. अतुल मुळे यांनी पशुपैदास धोरण, शास्त्रीय पशुधन व्यवस्थापन, खनिज मिश्रणाचे महत्त्व व योग्य वापर, तसेच वार्षिक चारा नियोजन व चारा पिकांची लागवड याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या सर्व 65 पशुपालकांना खनिज मिश्रणाचे वाटप करण्यात आले. जनावरांचे आरोग्य, दूध उत्पादन आणि प्रजनन कार्यक्षमता सुधारण्यासाठी खनिज मिश्रणाचे महत्त्व यावेळी पशुपालकांना समजावून सांगण्यात आले. यावेळी नूतन क्षीरसागर, लिलेश चव्हाण व नरेश कुलकर्णी यांनी बायफ बीआईएसएलडी च्या कार्याची तसेच पशुपालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या प्रशिक्षणामुळे पशुपालकांना आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी तसेच पशुधनाचे आरोग्य, पोषण, प्रजनन व चारा व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.
