वाशी (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. शासनाच्या निर्देशानुसार शिधापत्रिकेवरील पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक असून, अद्याप प्रक्रिया पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांनी 30 सप्टेंबर 2026 पूर्वी ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार वाशी यांनी केले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, सुलभ आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या ‘एक देश, एक शिधापत्रिका' योजनेनुसार लाभार्थ्यांना त्यांच्या स्वगावी किंवा संबंधित राज्यात जाण्याची आवश्यकता नसून, कोणत्याही ठिकाणाहून ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार ही सुविधा ई-पॉस मशीनवर कार्यान्वित करण्यात आली आहे.
शासनाकडून वाशी तालुक्यातील ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांची तालुकानिहाय तसेच स्वस्त धान्य दुकाननिहाय यादी प्राप्त झाली आहे. ही यादी संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांकडे वितरित करण्यात आली असून, यादीतील सर्व शिधापत्रिकाधारकांनी आपले ई-केवायसी तातडीने पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.
यासाठी शिधापत्रिकाधारकांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह संबंधित स्वस्त धान्य दुकानात आधारकार्ड घेऊन जावे. तेथे ई-पॉस मशीनवर अंगठ्याचे प्रमाणीकरण करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. तसेच ‘ ' मोबाईल ॲप्लिकेशनद्वारेही ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. शिधापत्रिकेवरील कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण होणे आवश्यक असल्याने लाभार्थ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण न झाल्यास संबंधित लाभार्थ्यांचा अन्नधान्याचा लाभ वाटप थांबविण्याची शक्यता असल्याने अंतिम मुदतीची वाट न पाहता प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. दरम्यान, ई-केवायसीसाठी लाभार्थ्यांनी संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. दिनांक 30 सप्टेंबर 2026 पूर्वी सर्व संबंधित शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार वाशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.