वाशी (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद कन्या प्रशाला, वाशी येथील विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विविध मैदानी क्रीडा प्रकारांत विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी करत पदकांची कमाई केली.
400 मीटर धावणे (वयोगट 14 वर्षे) या क्रीडा प्रकारात प्रतिक्षा चेडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच लाँग जंपमध्ये निकिता गुंड हिने द्वितीय क्रमांक मिळविला. उंच उडीच्या स्पर्धेत प्रणाली हिंगमिरे हिने द्वितीय क्रमांक मिळवत यश संपादन केले. 4 x 400 मीटर रिले (वयोगट 14 वर्षे) या सांघिक प्रकारात प्रतिक्षा चेडे, अनुरका चव्हाण, मनीषा पवार, हर्षी मुखे व निकिता गुंड यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तर 4 x 400 मीटर रिले (वयोगट 16 वर्षे) या प्रकारात प्रणाली हिंगमिरे, आलिशा ताबोळी, मनीषा कवडे, अनुराधा रणदिवे व प्रिया कवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल विद्यार्थिनींचे मुख्याध्यापक अभिमन्यू गवळी सर, क्रीडा शिक्षक बालाजी क्षीरसागर सर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनींनी मिळविलेले हे यश त्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित सरावाचे फलित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
