धाराशिव (प्रतिनिधी)- पावसाच्या दीर्घ खंडाने हिरवेगार शिवार करपले. सोयाबीनसह खरीप पिकांवर केलेला खर्च डोळ्यांसमोर वाया गेला. उसाची वाढ खुंटली आणि पुढचा रब्बी हंगाम कसा घ्यायचा, जनावरांच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी करायची,या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला असताना अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी घेतला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुके ‘ट्रिगर-1'मध्ये आले आहेत. त्यामुळे महसूल सवलतीचा लाभ मिळणार आहे.
जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा आणि उमरगा या आठही तालुक्यांचा खरीप हंगाम 2026 मधील ‘प्रथम कळ (1)' लागू झालेल्या दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 23 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली होती. धाराशिव तालुक्यातील करजखेडा आणि कळंब तालुक्यातील मलकापूर येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. या दौऱ्यात शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासन निर्णय दोन दिवसांत काढण्याची ग्वाही त्यांनी दिली होती.त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी मदत व पुनर्वसन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.शासन निर्णयानुसार राज्यातील एकूण 265 तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-1' लागू करून दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना बारा उपाययोजना-सवलती
शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागात विविध सवलती आणि उपाययोजनांचा मार्ग मोकळा झाला आहे.जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन,शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती,कृषिपंपाच्या चालू वीजबिलात पात्रतेनुसार सूट आणि शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेतील कामांच्या निकषांत शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही, शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी आणि शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही, जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध करून देणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी आवश्यक पाण्याचे नियोजन करण्याचेही निर्देश आहेत. आता बांधावर जावून जीपीएस नोंद सह फोटो व पंचनामे करणे बंधनकारक आहे.