तुळजापूर (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापुरात विविध धार्मिक उत्सवांची तयारी सुरू असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा हरतालिका, श्री गणेश प्रतिष्ठापना, ज्येष्ठा गौरी आवाहन, पूजन व विसर्जन तसेच अनंत चतुर्दशीच्या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. मात्र पावसाने उघडत दिल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने आगामी काळात पाऊस पडला तरच हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे. 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये बैल पूजन सोहळा गुरुवार, दि. 10 रोजी सायंकाळी संपन्न होणार आहे. यंदा तृतीय तिथीला वृद्धी व क्षय एकत्र आल्याने रविवार, दि. 14 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत हरतालिका पूजन करता येणार आहे. त्यानंतर श्री गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त राहणार आहे. श्रावणी अमावस्या गुरुवार, दि. 10 रोजी सकाळी 10 वाजून 33 मिनिटांनी प्रारंभ होऊन शुक्रवार, दि. 11 रोजी सकाळी 8 वाजून 56 मिनिटांनी समाप्त होणार आहे.

भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 9 नंतर घराघरांत श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यामुळे तुळजापूर शहरासह तालुक्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 1993 नंतर प्रथमच 12 दिवसांचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. गुरुवार, दि. 17 रोजी ज्येष्ठा गौरी आवाहन, शुक्रवार, दि. 18 रोजी ज्येष्ठा गौरी पूजन, तर शनिवार, दि. 19 रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन होणार आहे. त्यानंतर शुक्रवार, दि. 25 रोजी अनंत चतुर्दशी असून या दिवशी श्री गणेश विसर्जनाने गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवातील धार्मिक परंपरा, गौरी पूजन आणि विसर्जन सोहळ्यामुळे तुळजापूर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

 
Top