धाराशिव (प्रतिनिधी)- कर्जाच्या थकबाकीमुळे नव्याने कर्ज घेण्याचा मार्ग बंद झालेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढून पुन्हा आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2026'अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध झाली आहे.या यादीत जिल्ह्यातील 17 हजार 625 शेतकऱ्यांचा समावेश आहे. यादीतील शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा'त जाऊन दोन दिवसांत आधार प्रमाणीकरण करून ॲग्रीस्टॅक क्रमांक द्यावा,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,धाराशिव यांनी केले आहे.
बँकांकडून कर्ज घेऊन थकबाकीत गेल्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी पुन्हा नव्याने कर्ज घेण्यासाठी अपात्र ठरले होते.अशा शेतकऱ्यांना पुन्हा कर्जवाटप करता यावे आणि त्यांची कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी मुक्तता व्हावी,या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026' जाहीर केली. शासन निर्णयानुसार 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले आणि 1 एप्रिल 2019 नंतर वाटप करण्यात आलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली आहे.
30 सप्टेंबर 2025 रोजी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड अर्थात ‘ओटीएस' योजना लागू करण्यात आली आहे.या शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांवरील कर्जाची रक्कम 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास राज्य शासनाकडून दोन लाख रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद शासन निर्णयात आहे.
राज्यात तिसऱ्या यादीत सुमारे 3.56 लाख शेतकरी कर्जमाफी आणि प्रोत्साहन लाभ देण्यासाठी महा-आयटीकडून संगणकीय पोर्टल विकसित करण्यात आले.या पोर्टलवर बँकांनी थकीत अल्पमुदत पीक कर्जदार शेतकऱ्यांची माहिती भरली होती. या माहितीवर महा-आयटीकडून संगणकीय संस्करण करून 22 जुलै 2026 रोजी 533 शेतकऱ्यांची पहिली यादी,तर 24 जुलै 2026 रोजी सुमारे 16.96 लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी आधार प्रमाणीकरणासाठी राज्यस्तरावर जाहीर करण्यात आली.त्यानंतर 11 सप्टेंबर 2026 रोजी तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून राज्यातील सुमारे 3.56 लाख शेतकऱ्यांचा त्यात आधार प्रमाणीकरणासाठी समावेश करण्यात आला आहे.
दुसऱ्या यादीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील 46 हजार 915 थकीत कर्जदार शेतकऱ्यांची गावनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या 34 हजार 7 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर 289 कोटी 72 लाख 44 हजार 660 रुपये जमा झाले आहेत.
आता 11 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या यादीमध्ये जिल्ह्यातील आणखी 17 हजार 625 शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे. ही यादी विविध मोबाईल ग्रुपवर तसेच प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालय,तलाठी कार्यालय आणि चावडीवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना बँकेत कोणतीही रक्कम भरायची नाही.तिसऱ्या प्रसिद्ध यादीतील सर्व शेतकरी कर्जमाफी योजनेतील असून त्यांना कोणतीही रक्कम बँकेकडे भरावयाची नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.मात्र, कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी यादीतील प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा'त जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आणि ॲग्रीस्टॅक क्रमांक देणे आवश्यक आहे.आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच संबंधित शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.त्यामुळे यादीत नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी विलंब न करता, लवकरात लवकर म्हणजे दोन दिवसांत आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाव नसल्यास बँक शाखेशी संपर्क साधावा.कर्जमुक्तीची प्रक्रिया पुढेही सुरू राहणार आहे.यापुढे चौथी आणि आवश्यकता भासल्यास पाचवी यादीही पुढील काही दिवसांत प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे सध्याच्या यादीत नाव नसलेल्या पात्र शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. ज्या शेतकऱ्यांचे नाव तिसऱ्या यादीत आलेले नाही; मात्र त्यांचे अल्पमुदत पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होते आणि ते कर्ज 1 एप्रिल 2019 नंतर घेतलेले आहे,अशा शेतकऱ्यांचे नाव पुढील यादीत येण्याबाबत त्यांनी आपल्या संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, धाराशिव यांनी केले आहे. बैठकीचे प्रास्ताविक संघटनेचे तज्ञ संचालक प्रवीण प्रजापती यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष विजय नाडे, संजय खरात, एकनाथ चाळक, ओंकार खुरपे, ऋषिकेश काळे, दिलीप उढाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.