पशुपालकांचा हिस्सा केवळ १५ टक्के ; जनावर दगावल्यास कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर १५ दिवसांत DBT द्वारे विमा रक्कम
धाराशिव (प्रतिनिधी)- नैसर्गिक आपत्ती, अपघात तसेच अन्य कारणांमुळे पशुधनाचे नुकसान झाल्यास शेतकरी व पशुपालकांना आर्थिक फटका बसू नये यासाठी ‘पशुधन विमा योजना’ राबविण्यात येत आहे.योजनेत विमा हप्त्याच्या ८५ टक्के रकमेचे अनुदान शासनाकडून मिळणार असून, पशुपालकांना केवळ १५ टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी आपल्या पशुधनाचा विमा काढावा,असे आवाहन जिल्हा परिषद धाराशिवच्या पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
गायीसाठी ७० हजार, म्हशीसाठी ८० हजारांचे संरक्षण
योजनेत पशुधनाच्या प्रकारानुसार कमाल विमा संरक्षण निश्चित केले आहे.दुभती गाय व बैल यांच्यासाठी प्रत्येकी ७० हजार रुपये,तर दुभती म्हैस व रेड्यासाठी प्रत्येकी ८० हजार रुपये कमाल विमा संरक्षण आहे.शेळी व मेंढीसाठी प्रति जनावर ७ हजार रुपये संरक्षण मिळेल.एका कुटुंबातील जास्तीत जास्त १० पशुधनासाठी अनुदानाचा लाभ घेता येईल.
विमा कालावधीनुसार एक वर्षासाठी ४.३० टक्के,दोन वर्षांसाठी ७.४० टक्के आणि तीन वर्षांसाठी १०.४० टक्के प्रीमियम दर निश्चित आहेत.उदाहरणार्थ, ७० हजार रुपयांचे विमा संरक्षण असलेल्या संकरित गाईचा एक वर्षाचा विमा हप्ता ३,०१० रुपये आहे.त्यापैकी पशुपालकाचा १५ टक्के हिस्सा केवळ ४५१.५० रुपये असून उर्वरित रक्कम शासनाच्या अनुदानातून भरली जाते.
‘SARUS’ ॲपवरून नोंदणी
विमा नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पशुपालकांना SARUS मोबाईल ॲपचा वापर करता येणार आहे.Google Play वर उपलब्ध असलेल्या या ॲपचे डेव्हलपर Agriculture Insurance Company of India Limited (AIC) असून, त्यामध्ये शेतकरी व Allied Insurance Products साठी नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. पशुधन विम्याची विस्तृत माहितीही या ॲपद्वारे मिळू शकते.
‘No Tag,No Claim’
विम्यासाठी पशुधनाची नोंद ‘भारत पशुधन प्रणाली’ (NDLM) वर असणे आणि पशुधनाला १२ अंकी कानातील टॅग/UID (Ear Tag) असणे आवश्यक आहे.विमा कंपनी UID सोबत RFID तंत्रज्ञानाचाही वापर करू शकते. ‘No Tag, No Claim’ या नियमानुसार टॅग नसलेल्या पशुधनाचा विमा दावा ग्राह्य धरला जाणार नाही.
विमा काढताना आवश्यक कागदपत्रे,पशुधनाची ओळख, UID/Ear Tag यांची पूर्तता करणे आवश्यक आहे.विमा दावा उद्भवल्यास आवश्यक कागदपत्रे आणि पोस्टमॉर्टेम अहवाल वेळेत सादर करावा लागणार आहे.
जनावर दगावल्यास तातडीने संपर्क करा
विमाधारक पशुधनाचा मृत्यू झाल्यास पशुपालकांनी विलंब न करता संबंधित विमा कंपनीशी १९६२ किंवा ९०६३१४२२९९ या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधून माहिती द्यावी.विमा कंपनीच्या नियमानुसार आवश्यक कार्यवाही, पशुवैद्यकीय तपासणी व पोस्टमॉर्टेम प्रक्रिया पूर्ण करून कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
दावा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे व पोस्टमॉर्टेम अहवाल प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत पात्र विमा रक्कम पशुपालकाच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करण्याची तरतूद आहे.
महत्त्वाचे म्हणजे,जनावर दगावल्यास मृत जनावराची विल्हेवाट लावण्यापूर्वी विमा कंपनी किंवा संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. त्यामुळे विमा दावा प्रक्रियेत अडचण निर्माण होणार नाही.
जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी पशुधन विमा महत्त्वाचा आहे.त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुधनाचा विमा काढून संभाव्य आर्थिक जोखमीपासून संरक्षण मिळवावे आणि शासनाच्या ८५ टक्के अनुदानाचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा परिषद धाराशिवच्या पशुसंवर्धन विभागाने केले आहे.