धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू आहे.शेतकऱ्याच्या हातात पैसा आला, शेती सक्षम झाली तर गावाची आणि जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत होते.शेतकरी,महिला,युवक,उद्योग,शिक्षण,आरोग्य आणि पर्यावरण या सर्व क्षेत्रांचा समतोल विकास साधत ‘विकसित भारतासाठी विकसित धाराशिव' घडविण्याचा संकल्प करूया,असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 80 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री सरनाईक बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक बलभीम पाटील, बुबासाहेब जाधव,दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नी कलावती उंबरे,केसरबाई टापरे,जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,पोलिस अधीक्षक रितू खोखर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री सरनाईक म्हणाले की,‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2026'च्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 70 हजार ते 1 लाख 80 हजार शेतकऱ्यांना सुमारे 1 हजार 400 कोटी रुपयांपर्यंतचा लाभ अपेक्षित आहे. आतापर्यंत 12 हजार 294 थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर 105 कोटी 86 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. ‘हर घर जल' अभियानांतर्गत जिल्ह्यातील 2 लाख 64 हजार 480 घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा झाला असून,297 गावे ‘हर घर जल' म्हणून घोषित झाली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अत्याधुनिक उपचार व शस्त्रक्रिया सुविधांमुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तसेच लाभार्थ्यांना योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी,विविध क्षेत्रांतील मान्यवर,विविध पक्षांचे पदाधिकारी,नागरिक,पत्रकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हनुमंत पडवळ यांनी मानले.
