धाराशिव (प्रतिनिधी)- रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे महिला सक्षमीकरण विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि धाराशिव जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने 'तीस दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराच्या 'अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक पिंक पथक पोलीस उपनिरीक्षक राकेश बनसोडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे महत्त्व, महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले उपाय योजना व दैनंदिन जीवनात सतर्क कसे राहावे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सक्षमीकरण विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती जाधव यांनी केले व त्यांनी स्वसंरक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची रूपरेषा मांडली.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांनी विद्यार्थ्यांना मुलांबरोबर मुलींनीही तयार झाले पाहिजे हेच या प्रशिक्षणाचे ध्येय आहे असा संदेश दिला. तसेच मुलींना अधिक गती देण्यासाठी हे प्रशिक्षण विनामूल्य ठेवण्यात आले आहे. म्हणून या प्रशिक्षणाचा लाभ सर्व विद्यार्थिनींनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा थोरात यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. सुवर्णा गेंगजे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील महिला सक्षमीकरण विभागाच्या सहसमन्वयक प्रा. शिल्पा डोळे, सर्व महिला प्राध्यापक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
